मुंबई :सीमा हैदर हे नाव देशातील प्रत्येक नागरिकांला माहित आहे. प्रेमासाठी सीमानं दोन देशांची सीमा ओलांडली. देशातून सीमाच्या प्रेमाला इतका कोणी विरोध केला नाही. परंतु तिच्या प्रेमकथेच्या सिनेमाला विरोधाचा सामना करावा लागतोय. या दोघांच्या प्रेमकथेवर आता सिनेमादेखील निघणार असल्याची चर्चा आहे. परंतु या चित्रपटावरुन नवा वाद सुरू झालाय. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'कडून या चित्रपटाला विरोध केला जातोय. हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिलाय.
चित्रपटाला विरोध :दोघांच्या प्रेमकथेवर 'कराची टू नोएडा' नावाचा चित्रपट तयार होणार होणार आहे. यासाठी नोएडामध्ये कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत त्यांचे एक 'चल पडे है हम' हे गाणंही लाँच करण्यात आलं. पण 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन'(IMPPA)ने या चित्रपटाचं शीर्षक मुंबईत ऑफलाइन नोंदवायला नकार दिलाय. 'मनसे'च्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप चित्रपट निर्माते अमित जानी यांनी केलाय. 'जानी फायरफॉक्स' चित्रपटाचे निर्माते अमित जानी हे सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकथेवर चित्रपटाची घोषणा केलीय. त्यांना शीर्षक नोंदवण्यासाठी मुंबईत यायचं होतं. पण 'इम्पा'चे सचिव अनिल नागरथ यांनी चित्रपटाचं शीर्षक नोंदवण्यासाठी असोसिएशनच्या मुंबई कार्यालयात येण्यास चित्रपटनिर्मात्याला मज्जाव केलाय.
काय म्हणाले खोपकर: या चित्रपटाला 'कराची टू नोएडा' हे शीर्षक नोंदवण्यासाठी तुम्ही आमच्या कार्यालयात आलात तर मनसेचे कार्यकर्ते 'इम्पा'चं कार्यालय फोडतील, असं 'इम्पा'चे सचिव अनिल नागरथ म्हणाल्याचा निर्माता जानी यांचा दावा आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना, जर 'इम्पा'नं असं केलं असेल तर आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. खरंतर आम्हाला त्या जानी नावाच्या निर्मात्याबद्दल बोलून त्याचं महत्त्व अजिबात वाढवायचं नाही. हे सर्व फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललंय. नावाला विरोधाचा विषय राहू देत. मनसे हा चित्रपट मात्र 100 टक्के प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी गर्भित धमकी दिलीय.
'मनसे'च्या दबावाखाली निर्णय :'इम्पा' ने चित्रपटाचे शीर्षक नोंदवण्याचं नाकारल्यानंतर चित्रपट निर्माते अमित जानी यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. 'इम्पा'चे सचिव अनिल नागरथ यांनी आपल्याला फोन करून मुंबई कार्यालयात मनाई केलीय. जर तुम्ही कार्यालयात आलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आमचे कार्यालय फोडेल. तुमच्या चित्रपटाच्या शीर्षकाची ऑनलाइन नोंदणी होते आहे', असं आपल्याला सांगण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. 'इम्पा' ने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे 17 ऑगस्टपर्यंत शीर्षक देण्याचं वचन दिलं होतं. यासाठी त्यांनी शुल्कही आकारलं, परंतु त्यांनी ही प्रक्रिया 24 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर मनसेच्या दबावाखाली 'कराची टू नोएडा' हे शीर्षक वादग्रस्त ठरवण्यात आलं.
हेही वाचा-
- Seema Haider News: सीमा-सचिनच्या चित्रपटाचं शीर्षकच इम्पानं नाकारलं; निर्माते म्हणाले, 'मनसेमुळे...'
- Anju in Pakistan : अंजू पाकिस्तानात गेल्याने कुटुंबाची वाढली चिंता, फेसबुक मित्र म्हणाला आम्ही लग्न...