मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांचे नाव सतत पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र अशा वेळी आदित्य यांचे काका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आदित्य यांची बाजू घेतली गेलीय.
ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशी काही गोष्ट झाली असेल, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तर पार्थ पवार यांचा कौटुंबिक विषय आहे, ते सोडवतील, असे नांदगावकर म्हणाले.
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे शिष्टमंडळाने आज बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेतली. त्या वेळी बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मनसेच्या शिष्टमंडळासोबत बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली. बेस्ट प्रशासनाने नागरिकांना भरमसाठ वीज बिलं पाठवून जो शॉक दिलाय. त्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या अनोख्या पद्दतीने बेस्ट प्रशासनाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही. याला पूर्णपणे बेस्ट प्रशासन जबाबदार असेल. यावेळी बेस्ट भवन येथे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.