मुंबई - मोबाईलवरुन एखाद्याला कॉल केल्यावर कोरोना संदर्भात जनजागृती करणारी रिंग ऐकू येते. मात्र, आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे, तरी आपण गरज नसताना घराबाहेर पडू नये ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते. कोरोनाची विविध माध्यमातून करायची तितकी जनजागृती झाली आहे. मात्र, आता त्यामुळे नागरिक त्रासले असून कोरोना कॉलर ट्यून बंद करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर केली आहे.
जनजागृती झाली..! आता कोरोना कॉलर ट्यून बंद करा; मनसेची मागणी
कोरोनाची विविध माध्यमातून करायची तितकी जनजागृती झाली आहे. मात्र, आता त्यामुळे नागरिक त्रासले असून कोरोना कॉलर ट्यून बंद करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात 'आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही' ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत होती. आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी आपण गरज नसताना घराबाहेर पडू नये ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते. काही सेकंद ही कॉलर ट्यून सुरू असल्यामुळे अनेक महत्त्वाचे कॉल घेता येत नाहीत, असे बाळा नांदगावकर यांचे म्हणणे आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता ती बंद करावी अशी मागणी नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.