मुंबई -महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात एक नवीन समिकरण पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या खलबत झाले. त्यानंतर आता सेनाभवनासमोर 'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' असा मजकूर असलेले भगव्या रंगातील बॅनर लावले आहे. यासंबंधी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
हेही वाचा - करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट ठरवून झाली नाही - बलजीत परमार
23 जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनासाठी मनसे नेते सध्या जोमाने तयारीला लागले आहेत. यातच आता भगव्या रंगातील पोस्टर सेनाभवनासमोर लावून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशामुळे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आगामी काळामध्ये नवीन रणनिती आखण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. येत्या 23 जानेवारीला गोरेगावमधील नेस्को येथे होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात मनसेचा झेंडा बदलण्यात येणार आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'