मुंबई :राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यापूर्वीसुद्धा तीनवेळा भेट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीसुद्धा भेट देऊन आले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे मनसे पक्षाचा आधार घेऊ शकतात, अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. आता पुन्हा एकदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र यावी यासाठी काही स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत.
पानसे राऊत भेट: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची यासंदर्भात नुकतीच एक भेट झाली. या भेटीनंतर संजय राऊत हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटले तर अभिजीत पानसे हे राज ठाकरे यांना भेटल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जर परस्परांशी बोलायचे असेल तर अन्य कोणाची गरज नाही, ते एका फोनवर बोलू शकतात. कारण ते दोघे भाऊच आहेत असे स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी या भेटीनंतर दिले आहे.