महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देश रसातळाला जात असताना तुम्ही थंड कसे - राज ठाकरे - मनसे प्रमुख राज ठाकरे

राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत, बँका बुडीत निघत आहेत, अर्थव्यवस्थेत मंदी आल्याने बेरोजगारी वाढली आहे. मुंबईमधला मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे. इतके सर्व होत असताना तुम्हाला राग येत नाही का? इतके सर्व होत असताना तुम्ही थंड कसे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे

By

Published : Oct 17, 2019, 8:55 PM IST

Updated : Oct 18, 2019, 10:41 AM IST

मुंबई- राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत, बँका बुडीत निघत आहेत, अर्थव्यवस्थेत मंदी आल्याने बेरोजगारी वाढली आहे. मुंबईमधला मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे. इतके सर्व होत असताना तुम्हाला राग येत नाही का? इतके सर्व होत असताना तुम्ही थंड कसे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. माहीम मतदारसंघातील संदिप देशपांडे यांच्या प्रचारासाठी प्रभादेवी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

हेही वाचा -शौर्य सैनिकांचे अन् हे स्वतःची पाठ थोपटवतायत - शरद पवार

यावेळी बोलताना निवडणुका आहेत म्हणून सरकार विरोधात बोलून काळी बाजू दाखवत नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. पंजाब-महाराष्ट्र बँक बुडीत निघाल्याने 3 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काल एका बाईने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही आकडेवारी पाहिल्यास राज्यात दिवसाला 3 आत्महत्या होत असल्याचे राज यांनी सांगितले. बँका बुडत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, मंदीची लाट आहे, यात काही सुधारणा होऊ दे, अशी मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो. पण यात सुधारणा होईल असे काही दिसत नसल्याचे राज म्हणाले.

राज ठाकरेंचा माहीम येथील प्रचारसभेत घणाघात

5 लाख उद्योग बंद -

मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था उंचीवर नेऊन ठेवली होती. त्यांनी येत्या काळात अर्थव्यवस्था आणखी खराब होणार असल्याचे व याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार असे सांगितले. आज 5 लाख उद्योगधंदे बंद झाले आहेत. या मंदीचा फटका महाराष्ट्राला बसणार असून आणखी नोकऱ्या जाणार आहेत. 2 हजारच्या नोटा छापणे रिझर्व्ह बँकेने बंद केले आहे. या नोटा बंद केल्या तर पुन्हा तुम्हाला रांगेत उभे राहावे लागणार आहे. देश आणखी खड्ड्यात जाणार असल्याचे सांगत मोदी सरकारला देश कुठे न्यायचा आहे? असा प्रश्न राज यांनी विचारला.

हेही वाचा -उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा

मनसेमुळे टोल बंद -

मुंबईमधून भारताला 33 टक्के महसूल दिला जातो, त्याव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून वेगळा कर आपण भरतो. देशात सर्वात जास्त कर मुंबईमधून भरला जातो. मात्र, त्याबदल्यात चांगले रस्ते, फुटपाथ मिळत नाहीत, रस्ते चांगले नसले तरी टोल भरावा लागतो. महायुतीच्या सरकारने टोल माफी देऊ, असे सांगितले. सरकार सत्तेवर आल्यावर टोल माफी करायला विसरले. आम्ही आंदोलन केल्यावर 78 टोल बंद करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेवर टीका -

शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ असे म्हटले आहे. ही थाळी नंतर 100 रुपयांची होईल. जाहीरनामे पाळायचे नसतील तर हवे कशाला ते जाळून टाका, असे ठाकरे म्हणाले. मुंबईत नव्या बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा 200 कोटींचे टेंडर काढले जाते. यामधून यांना टक्के मिळतात. असा आरोप करत खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

हेही वाचा -भाजपने फक्त आश्वासनांची खैरात वाटली; ओवैसींचे टीकास्त्र

मेट्रो मराठी माणसाचा घात करणार -

मेट्रोसाठी तुम्हाला आणि आरेच्या झाडांना चिरडून टाकले जात आहे. कुलाबामध्ये कारशेड सुरू करा असे सुचवले होते. पण तिथले भूखंड बिल्डरांच्या घशात घालायचे आहेत. दादर परेल शिवाजी पार्कमधल्या भाषा बदलल्या आहेत. मेट्रो सुरू झाल्यावर इथल्या जागांचे भाव वाढतील. आणि एक दिवस मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जाईल. ही मेट्रो मुंबईमधल्या मराठी माणसाचा घात करणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

सरकार रामन राघव -

मेट्रो करशेडसाठी 2700 झाडे तोडली. आता त्यापैकी 4 झाडे तोडायची उरली आहेत. तरीही शिवसेनेचे पक्षप्रमुख चिंता करू नका बोलत आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही झाडे तोडू देणार नाही बोलत आहेत. मग आता कुणाचे सरकार आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. ही झाडे तोडली तेव्हाच आरेमध्ये जाऊन का उभे राहिले नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. रात्रीची झाडे तोडली तेव्हा मला रात्रीचा खून करणारा रामन राघव आठवला. त्याच्या प्रमाणे रात्री झाडे तोडणारे सरकारही रामन राघव असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

Last Updated : Oct 18, 2019, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details