मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे नवनवे घोटाळे बाहेर काढण्याचा धडाका मनसेने लावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी वॉर्ड क्रमांक 156 मध्ये महिला बचत गट आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून टक्केवारी घेत लाखो रुपयांची वसुली केली असल्याचा आरोप केला आहे.
दरमहिन्याला चेक दिले
या घोटाळ्याच्या संबंधित असलेल्या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा मीना फडतरे यांच्याकडून नगरसेविका माटेकर यांनी महिन्याला 89 हजार रुपयांचा धनादेश घेतला आहे. तसेच संघर्ष महिला विकास संस्थाही त्यांनी हडप केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. फडतरे यांनीही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपण स्वतः दरमहिन्याला चेक दिले असल्याचे सांगितले आहे.
60 ते 90 टक्के कमीशन आम्हाला पाहिजे
मीना सुभाष फडतरे या संघर्ष महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आहेत. पूर्वी नगरसेवकांच्या सांगण्यानुसार संस्थेला दत्तक वस्ती योजनेचे काम दिले जात होते. नंतर लॉटरी पद्धत सुरू करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक 156 येथे मीना फडतरे यांना हे काम मिळाले. काम मिळाल्यानंतर या ठिकाणी असलेले ननगरसेविका वारंवार बोलवायला लागले. महानगरपालिकेकडून येणारे पेमेंट दर महिन्याला येते त्यातून ६० ते ९० टक्के कमीशन आम्हाला पाहिजे, नाहीतर काम करायला देणार नाही. वॉर्ड ऑफिसरला सांगून तुमची संस्था काळ्या यादीत टाकू, अशी धमकी देण्यात आली. यानंतर जबरदस्तीने चेकवर स्वतःच्या भावाच्या आणि नगरसेविकेच्या दीराच्या नावाने चेक बनवण्यात आले असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.