मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड उपलब्ध होत नसल्यामुळे नॉन-कोविड रुग्णांचा देखील मृत्यू होत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पालिकेचा के पूर्व आरोग्य विभाग ढासळलेला आहे. आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतात. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवारी) अंधेरीच्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी के पूर्व पालिका विभागाबाहेर निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले.
खासगी रुग्णालयात नॉन-कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यामुळे अनेकांना या लॉकडाऊनमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अंधेरीत कोविड रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालय आहे. तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने इतर रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होत नाही. अंधेरी पूर्वेत कुठे आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहेत, याची कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप मनसेचे पदाधिकारी रोहन सावंत यांनी केला आहे. तर काही वेळातच अंधेरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.