महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनधिकृत बांधकामामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे पद धोक्यात - कॉलनी

राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा रहाटे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची न्यायालयीन कार्यवाही करण्यासाठी पालिका प्रशासनाने सभागृहाकडे परवानगी मागितली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा रहाटे

By

Published : Apr 25, 2019, 7:57 PM IST

मुंबई- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर खोटे जात प्रमाणपत्र सादर करणे, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे, अनधिकृत बांधकाम करणे आदी बाबींमुळे अनेक नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यात आता आणखी एका नगरसेविकेची भर पडणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा रहाटे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची न्यायालयीन कार्यवाही करण्यासाठी पालिका प्रशासनाने सभागृहाकडे परवानगी मागितली आहे.

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये संपन्न झाली. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ११९ मधून मनीषा रहाटे या निवडून आल्या. त्या राहत असलेल्या विक्रोळी, हरियाली व्हिलेज येथील यशवंत कॉलनीमधील त्यांच्या घराचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. मात्र, त्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सुनीता हांडे यांनी २ मार्च २०१७ ला पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. अशाच प्रकारची तक्रार हांडे यांनी २५ एप्रिल २०१७ रोजी करून मनीषा रहाटे यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. पालिकेने याबाबत कारवाई न केल्याने हांडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मनीषा रहाटे यांच्याविरोधात सुनीता हांडे यांनी याप्रकरणी लघुवाद न्यायालयात (६०/२०१७) याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच सुनीता हांडे यांनी उच्च न्यायालयातही रिट याचिका (२२२२/२०१८) दाखल केली होती. त्यावर संबंधितांविरोध काय कारवाई केली याची माहिती पालिकेने २ आठवड्यात अथवा महिनाभरात तक्रारदार महिलेला द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी नगरसेविका रहाटे यांना अपात्र ठरविण्याची न्यायालयीन कार्यवाही करण्यासाठी पालिका प्रशासनाने सभागृहाकडे परवानगी मागितली आहे. पालिकेच्या आगामी सभेत यासंदर्भात परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पालिका सभागृहाने प्रशासनाला तशी परवानगी दिल्यास मनीषा रहाटे यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details