मुंबई - सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई तीव्र केली आहे. सोमवारी एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्या १२ हजार बेजबाबदार लोकांवर कारवाई करत २४ लाखाचा दंड आकारला आहे. २० एप्रिलपासून आतापर्यंत ६८ लाख ३८ हजार ६० लोकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १४ कोटी ४ लाख ६ हजार २०० रुपये दंड आकारल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढली -
मुंबईत सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि पालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे आणि मास्क लावणे, प्रत्येकाला अनिवार्य आहे. लोकांमध्ये अद्याप याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. उलट मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्येत वाढ होत आहे. सोमवारी एका दिवसात विना मास्क फिरणाऱ्या तब्बल १२ हजार ७१ जणांवर कारवाई करण्यात आली.
या विभागात अधिक कारवाई -
परळ, दादर, सायन, माटुंगा, माहीम भागात सर्वाधिक १ लाख २५ हजार ५२६ जण विनामास्क आढळून आले. त्यानंतर अंधेरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये १ लाख ४ हजार ६६६ विनामास्क फिरणाऱ्यालोकांवर कारवाई करण्यात आली. तर फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, गिरगाव, ग्रान्टरोड भागात ९८ हजार ४८४ लोक विनामास्कचे आढळून आले होते. बोरीवली, दहिसर, कांदिवली, विक्रोळी, भांडूप, मुलुंड भागात देखील विनामास्क फिरणाऱ्याचे प्रमाण ९० हजारच्या घरात होते. चेंबूर, गोवंडी, मानखूर्द भागात सर्वात कमी म्हणजे ७७ हजार ५३४ जण विनामास्क आढळून आले. पालिकेने त्यांच्यावर कारवाई करत २४ लाख १४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
६८ लाख लोकांवर कारवाई -
कोरोनाचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून पालिकेने मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. मास्क न घातल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी दंड वसुलीनंतर मास्कही मोफत दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक मास्क घालत नसल्याचे समोर आल्याने पालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. २० एप्रिलपासून आतापर्यंत ६८ लाख ३८ हजार ६० लोकांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून १४ कोटी ४ लाख ६ हजार २०० रुपये दंड आकारल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.