मुंबई -अंधेरी-वर्सोवा-घाटकोपर मेट्रो 1 मार्गाच्या माध्यमातून मुंबईकर गेल्या काही वर्षांपासून प्रवास करत आहेत. याचबरोबर येत्या अडीच-तीन वर्षांत मुंबईकर एका वेगळ्याच मेट्रो प्रवासाचा अनुभव घेणार आहेत. एकाच वेळेला भुयारातून म्हणजेच मुंबईच्या पोटातून आणि उंचावरून म्हणजेच उन्नत मार्गावरून प्रवास करता येणार आहे. मेट्रो 6 आणि मेट्रो 3 मार्गाचे एकत्रिकरण केल्याने मुंबईकरांचा मेट्रो प्रवास भविष्यात सुकर आणि वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे.
33.5 किमीचा कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प मुंबईतील पहिला पूर्णतः भुयारी मार्ग म्हणून संबोधला जात आहे. पण आता मात्र हा प्रकल्प पूर्णतः भुयारी मार्ग म्हणता येणार नाही. कारण, आता हा प्रकल्प एकाच वेळेला भुयारातून आणि उन्नत मार्गावरूनही जाणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. मेट्रो 3 च्या कारशेडचा प्रश्न लावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) आणि मेट्रो 3 प्रकल्पाचे एकत्रिकरण केले आहे.