मुबंई- वांद्रे कुर्ला संकुलाजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील स्कायवॉक तोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ७१४ मीटर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी हा स्कायवॉक तोडला जाणार आहे. आज रात्री ११ वाजल्यापासून पाडकामाला सुरुवात होईल. नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून वांद्रे वासीयांची सुटका होणार आहे.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने घेतलेला आढावा वांद्रेकुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्कायवॉकची दक्षिणेकडील मार्गिका (सी लिंक दिशेकडील) तोडली जाणार आहे. शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ यावेळेत दक्षिणेकडील मार्गिका, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री ११ ते सोमवारी पहाटे ५ यावेळेत पाडण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याकरिता परवानगी घेण्यात आली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये नव्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर तोडण्यात येणाऱ्या स्कायवॉकच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्यात येणार आहेत.
दरम्यान, वाहतुकीच्या मार्गात बदल केले जाणार आहेत. खेरवाडी पुलापासून कलानगर पुलापर्यंत दक्षिणेकडील वाहतूक शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. मात्र, वाहनचालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाकोला पुल ते माहीमकडून पुढे खेरवाडी, खेरवाडी जंक्शन, भास्कर कोर्ट जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन, पुढे धारावी टी जंक्शन असणार आहे.
रविवारी २३ जूनला रात्री ११ ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत माहीम कॉजवे जंक्शनपासून कलानगर पूल फायर ब्रीगेडपर्यंत उत्तरेकडील वाहतूक बंद असेल. याकाळात माहीम उत्तर दिशेने येणारी वाहने एस. व्ही. रोडवरून पुढे जातील. सी लिंककडून येणारी वाहने पश्चिम द्रुतगती महार्गावर वांद्रे रिक्लेमेशन येथे डावे वळण घेतील आणि एस.व्ही. रोडवरून पुढे जातील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.