मुंबई- खड्डे नसल्याचा दावा महानगर पालिकेकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. एकीकडे पालिकेकडून खड्डे नसल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे पालिकेने रस्त्यावर खड्डे दाखवा आणि पैसे कमवा, अशी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. पालिका प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी फेल ठरली म्हणून पालिकेकडून अशी योजना आणण्यात आली आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
शहर महापालिका रस्ते बांधणीसाठी करोडो रुपये खर्च करते. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून पुन्हा करोडो रुपये खर्च केले जातात. कधी हॉटमिक्स तर कधी कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो. मात्र, रस्त्यावर खड्डे आहे तशेच पुन्हा दिसतात. खड्डे ट्रॅकींग ऍप, व्हॉटसअॅप, ट्विटर आदी अनेक प्रकारे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे पालिकेला दाखवा, असे आवाहन करण्यात आले. तरीही मुंबईतील रस्त्यावर खड्डे आहे तशेच आहेत.
मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे आजही तसेच असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांना खड्डे निदर्शनास आणण्याचे आवाहन केले आहे. एक फूट लांब आणि तीन इंच खोल असलेल्या खड्डयाचा फोटो काढून पालिकेच्या खड्डे ट्रॅकींग ऍपवर पाठवायचा आहे. संबंधित विभागाला निदर्शनास आणलेला खड्डा २४ तासात बुजवला नाही तर त्या विभाग कार्यालयाला खड्डा निदर्शनास आणणाऱ्या नागरिकाला ५०० रुपये द्यावे लागणार आहेत. तसा पालिका आयुक्तांनी सर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना एक संदेश पाठवला आहे.