मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्जांवरून महाविकास आघाडीत धूसफूस पाहायला मिळाल्यानंतर आता अजून एक माहिती समोर आली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी राज्यातील वेगवेगळ्या विभागातील परिक्षा देखील असणार आहेत. यामुळे भाजप आमदार यांनी यावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र : पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारीला होणार आहेत. मात्र, याच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा देखील असल्याने याचा फटका निवडणुकांवर बसणार आहे. एकाच दिवशी पदवीधर मतदार संघातील निवडणूक आणि परीक्षा असल्यामुळे याचा फटका जवळपास दहा हजार पदवीधर मतदार यांना होणार असल्याची भीती विधानपरिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या पेचावर निवडणूक आयोगाने मार्ग काढावा, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मतदानाच्याच दिवशी परिक्षा : लोकशाही प्रक्रियेत निवडणुका या सर्वात महत्त्वाच्या असतात. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क हा बजावला केला पाहिजे. मात्र एकाच दिवशी पदवीधर मतदार संघात आलेल्या निवडणुका आणि परीक्षा यामुळे पदवीधर मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे या गंभीर मुद्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालावे, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ३० जानेवारीला नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.