मुंबई : महाविकास आघाडीत शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. शिंदे गटाने त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. वर्षभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा देत, मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या शिंदे गटाच्या इच्छुकांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रिमंडळ लवकरच विस्तार होईल, असे सांगण्यात येते. त्यापूर्वीच पालकमंत्री पदावरून शिंदे-पवार गटात जुंपली आहे. शिंदे गटाकडून अनेक भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना विरोध होतो आहे. बुलडाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उघडपणे यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. बुलढाण्यात शिंदे गट-भाजपचे पाच आमदार आहेत. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असायला हवा, असे गायकवाड म्हणाले आहेत.
समान निधी वाटप होईल: अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना भरीव निधी दिला. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांचा त्यांच्यावर वचक नव्हता. अजित पवारांचे त्यावेळी फावले होते. सत्ता पवारांच्या हातात होती. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. 24 तास काम करणारे नेतृत्व आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष असते. निधी वाटपात दुजाभाव होणार नाही. समान निधी वाटप होईल. महाविकास आघाडीच्या काळातील इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.