मुंबई - शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 91000 खातेदारांच्या 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल केलेली आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली असून या दोघांच्या नावावर असलेली बेनामी संपत्ती जप्त करून ईडी व सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.
सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. यानंतर आमदार रवी राणा यांनी ईडी कार्यालयात शिवसेना नेते अडसूळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, रवी राणा याना ईडीने बोलवलं की ते स्वतःहून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा -एकनाथ खडसे अडचणीत ? अंजली दमानिया यांच्याकडून ईडीला कागदपत्रे सादर
बँकेच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप
आमदार रवी राणा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे 91 हजार खातेदार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची खाती या बँकेत आहेत. यापैकी शेकडो जण रवी राणा यांच्याकडे येऊन त्यांनी त्यांची मेहनतीची रक्कम ही बँकेत बुडाली असल्याची तक्रार केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 900 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर याचा धक्का बसलेल्या खातेदारांपैकी आतापर्यंत 4 खातेदारांचा यामुळे मृत्यू झालेला आहे.
रवी राणा यांनी आरोप केलेला आहे की, तत्कालीन बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बँकेत जमा झालेला पैसा मोठ्या कंपन्या, बिल्डर यांना कर्ज स्वरूपात दिला होता. एवढेच नाही तर, बँकेच्या पैशाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेण्यासाठी आनंदराव अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांनी केला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
हेही वाचा -ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी