मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी पोलीस खात्यासह इतर खात्याचे मंत्रीही संबंधित अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी करतात का हे पहावे लागेल, जर असे सर्वच खात्यात होत असेल तर त्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी केली आहे.
परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप नेत्यांनी राज्यातील गृहमंत्र्यांना निशाणा साधत खडे बोल सुनावले आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर सडकून टीका करत म्हणाले, वसुली करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणखी नेमले आहे याची चौकशी ही झालीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
परमबीर सिंह यांनी काय केले पत्रातून आरोप
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या अधिकाऱ्याला शासकीय सदनिकेत बोलावून शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. सोशल सर्विस ब्रँचच्या अधिकाऱ्याला हुक्का, डान्स बार व इतर ठिकाणी धाडी मारून वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचाही त्यांनी पत्रात आरोप केला आहे.
गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप-
परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त सिंह यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले की, परमबिर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत परमबीर सिंह ?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांची फेब्रुवारी, 2019 मध्ये वर्णी लागली होती. जून, 2022 पर्यंत यांचा आयुक्त पदावर कार्यकाळ राहणार होता. मात्र, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्यानंतरच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती.
परमबीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंह यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लाललुचत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात कुख्यात दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याच्या कायदा व सुव्यस्थेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नेमण्यात आले होते.
हेही वाचा -गृहमंत्र्यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंह यांचा आरोप; अनिल देशमुखांनी 'ही' दिली प्रतिक्रिया