मुंबई -आम्ही नवीन निवडून आलेले आमदार आहोत. आम्ही कित्येक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट मागितली मात्र, त्यांनी अद्याप आम्हाला भेट दिलेली नाही. समाजवादीचे दोन आमदार असताना आम्हाला भेटत नाहीत मात्र एक आमदार असलेल्या मनसेच्या नेत्यांना ते भेटतात, असा टोला समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी लगावला आहे. नवीन आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट होणार का? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री भेटत नाहीत
मुस्लिम धर्मियांचा रमजान हा पवित्र सण काही दिवसांवर आला आहे. या सणादरम्यान मुस्लिम धर्मियांना मस्जिदमध्ये कोरोनाचे नियम पाळून नमाज अदा करायला द्या, कोरोना नियमांचे पालन करण्याचे अधिकार मस्जिदमधील धर्मगुरू आणि व्यवस्थापनांना द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागत आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही. असेही शेख यांनी सांगितले आहे.