मुंबई : दादर पूर्व येथील आरए रेसिडेन्सी टॉवरच्या ४२ व्या मजल्यावर काल रात्री आठच्या सुमारास आग लागली. सुरूवातीला लेव्हल दोनची असलेली आग थोड्याच अवधीत लेव्हल चारपर्यंत पोहचली. यावेळी स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली गेली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची घटना घडल्यामुळे टॉवर खाली करण्याचे काम सुरू झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्ध पातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु ४२ व्या मजल्यावर आग लागली असल्या कारणामुळे त्यांना तितपर्यंत पाणी नेण्यात अपयश येत होते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीत असलेली फायर फाईलट सिस्टीम बंद असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार ठरवले आहे.
महापालिका जबाबदार :या आगीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेले भाजपचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले की, आग ४२ व्या मजल्यावर लागली असल्या कारणामुळे त्यावर नियंत्रण आण्यासाठी वेळ लागत आहे. मुंबई महानगर पालिकेने इतक्या मोठ्या इमारतींना बांधकामासाठी परवानगी देताना सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. या इमारती मधील फायर फाईट सिस्टीम काम करत नसल्याचे दिसते आहे. तसेच बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीची फायर फायटिंग़ सिस्टिम निष्क्रिय ठरली आहे. यासाठी महापालिका जबाबदार आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचेही कोळंबकर यांनी सांगितले. कालिदास कोळंबकर यांनी या आगी संदर्भात मुंबई महानगर पालिकेला जबाबदार ठरवल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे.