मुंबई :काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. दरम्यान अशाच एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहोचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता.
अभियंत्याच्या कानशिलात लगावली : मीरा-भाईंदरमधील भाजप आमदार गीता जैन यांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. गीता जैन यांनी तरुण अभियंत्याच्या कानाखाली लगावली आहे. बेकायदा बांधकामावरील कारवाईबाबत गीता जैन आणि अभियंता यांच्यात वाद झाला. या बाचाबाचीमुळे गीता जैन यांनी अभियंत्याची कॉलर पकडून कानशिलात लगावली. गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद : मीरा-भाईंदरमधील प्रभाग समिती सहाचे अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या. यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि सोनी यांना त्यांनी चांगलेच खडसावले. परंतु त्याच वेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली लगावली. गीता जैन बोलत असाताना अभियंता शुभम पाटील हसले, त्यामुळे जैन यांनी संतापून पाटील यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. हे संपूर्ण प्रकरण अनधिकृत बांधकामांच्या वादातून घडले आहे.