मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे- भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा वारंवार केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे संघटनात्मक फेरबदल सध्या पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण या विराजमान होत्या. शरद पवार यांच्या हस्ते रोहिणी खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. (NCP Woman Wing President) (Rohini Khadse) (Rohini Khadse NCP Woman Wing President)
रोहिणी खडसे राष्ट्रवादीत सक्रीय -एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रोहिणी खडसे यांनी 2019 च्या विधानसभेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपामध्ये त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत पक्षाचं काम सुरू केलं. आता त्यांच्यावर पक्षानं नवीन जबाबदारी दिली आहे.
महिलांचं संघटन अधिक मजबूत करणार - या नियुक्तीबद्दल बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, वडिलांमुळं सुरुवातीपासूनच मी राजकारणात सक्रिय आहे.वडिलांचा मतदारसंघ बांधण्याचं काम केलं. त्यामुळे आता राज्यातही संघटन वाढीसाठी राज्यभर दौरे करणे आणि महिलांचं संघटन अधिक मजबूत करणं ही माझी प्राथमिकता राहणार आहे.