मुंबईMLA disqualification hearing - शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेच्या मॅरेथॉन सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सुनावणी नियमानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे.
मंगळवारी झालेल्या उलटतपासणी दरम्यान, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले. प्रभू यांनी उत्तर दिले. बहुतांश वेळ उलटतपासणीत गेला. आता आज सकाळी 11 वाजता पुन्हा उलटतपासणी होणार आहे. आज 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सलग आणि 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गरज पडल्यास हिवाळी अधिवेशनातही नागपुरात सुनावणी घेणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
याचिकांची सहा गटात विभागणी-ठाकरे गटाच्या आमदारांच्या वतीनं 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर ठाकरे गटाच्या आमदारांकडून एकत्रित सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. तर, शिंदे गटाकडून स्वतंत्र सुनावणीची मागणी सातत्याने केली जात आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्व याचिकांची सहा गटात विभागणी करून सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.