मुंबई MLA Disqualification Hearing :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून सुनावणीला विलंब लावत असल्याची वारंवार टीका होत आहे. मात्र सुनावणीच्या तारखेच्या एक दिवस आधी ते सुनावणी घेत आहेत. याबाबत राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली. जी 20 मधील पीठासीन अधिकाऱ्यांची P20 कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचं मला आमंत्रण आलं असून कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे 13 ऑक्टोबरला होणारी आमदार अपात्रतेची सुनावणी 12 ऑक्टोबरला घेत असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
निर्णयावर दबाव पडू देणार नाही :सुनावणीत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. तारीख पुढे नेऊ शकलो असतो; परंतु मला कोणत्याही प्रकारे वेळ घालवायचा नाही. म्हणूनच एक दिवस आधी सुनावणी घेऊन या विषयात मी पुढे जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. एक दिवस आधी सुनावणी घेत असल्यामुळे दिरंगाई करतोय की लवकर सुनावणी करतोय याबाबत प्रत्येकजण माहिती प्राप्त करू शकतो. विरोधकांचा टीका करण्यामागचा हेतू काय आहे हे मला माहिती आहे. टीका टिपणीच्या प्रयत्नातून माझ्या निर्णय प्रक्रियेवर कोणताही फरक पडणार नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल. मात्र, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडणार नाही आणि पडू देखील देणार नाही मी नियमानुसार आणि घटनेच्या तरतुदीनुसार निर्णय घेणार असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.