मुंबई-शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटानं दुसऱ्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालदेणार आहेत. निकालापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
Live Updates-
- शिवसेनेची 2018 ची सुधारित घटना भारतीय निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये नसल्याने ती वैध मानली जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, इतर कोणत्याही घटकाचा विचार करु शकत नाही. नोंदीनुसार, वैध संविधान म्हणून शिवसेनेच्या 1999 च्या घटनेवर आपण अवलंबून आहे, असं नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं.
- शिवसेनेच्या घटनेसंदर्भातच संभ्रम असल्याचं निकाल वाचनात दिसून आलं. निवडणूक आयोगाने वेगळी तर ठाकरे गटानं वेगळी घटना दिल्याचं नार्वेकरांनी नमूद केलं. तसंच १९९९ साली निवडणूक आयोगाला दिलेल्या घटनेनुसार निकाल देत असल्याचं नार्वेकर यांचं स्पष्टीकरण.
- विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनास सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी निकाल वाचनास सुरुवात केली आहे.
- शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात कोणत्याही क्षणी निकालाचे वाचन सुरू होण्याची शक्यता आहे. विधानभवनात अध्यक्ष नार्वेकर यांच्यासह संबंधित आमदार तसंच अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे नेमका निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
- थोड्याच वेळात विधान भवनात निकालाचे वाचन सुरू होणार आहे. या निकालाचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना हा अधिकृत पक्ष म्हणून आम्हाला मान्यता आहे. अध्यक्षांच्या निर्णयानंतर बोलणार आहे. निकाल विरोधात लागला की यांची टीका सुरू होते. चोराच्या मनात चांदणं असते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबरोबर आमची बैठक लपून-छपून झालेली नाही. आम्ही घटनाबाह्य नाही. ठाकरे गटच घटनाबाह्य आहे", अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
- कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, " राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदीच कायदा आणला. आत्ता याच कायद्यातून पळवाटही काढली जातं आहे. याला राजकीय लोक तसेच त्यांना सल्ला देणारे वकीलहेदेखील जबाबदार आहेत. आजचा निर्णय विधानसभा अध्यक्ष हे बरोबर देतील, ही अपेक्षा आहे."
- माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "शिवसेनेच्या 16 आमदारांनी पक्षांतर बंदी केलेली आहे. या 16 आमदारांची आमदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचं मंत्रीपद देखील रद्द केलं पाहिजे. ही कायदेशीर बाब झाली. पण यात अध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली, ते विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात. ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं होणार नाही. अध्यक्षांकडे जबाबदारी देणं हेच चुकीचं आहे."
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज देण्यात येणाऱ्या निकालाबाबत वक्तव्य केलं. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, "निकाल कायद्याला धरून असणार आहे. निर्णयात कुठलीही त्रुटी राहणार नाही. आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल. निकाल देताना कायद्याचं पालन करण्यात येणार आहे. निकाल हा आजच दिला जाईल. शेड्युल १० मध्ये इंटर प्रिटीशन आतापर्यंत झाले नव्हतं. त्याबाबत निश्चितपणं अत्यंत मूलभूत व अत्यंत बेंचमार्क असा निर्णय असणार आहे."
- आमदार अपात्रतेच्या आज होणाऱ्या निकालाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं. खासदार ठाकरे म्हणाले," विधनासभा अध्यक्षांनी तटस्थ राहायला हवे, आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. तुमचं मॅच फिक्सिंग झालं आहे. दीड वर्षातील प्रत्येक घटना घटनाबाह्य आहे. शिंदेंची गटनेतेपदी झालेली निवड कोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. घटनेनुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी राहणार नाहीत."
- आमदारांच्या अपात्रतेबाबत आज निकाल लागणार असताना विविध शक्यता होत आहेत. त्याबाबत वकील असीम सरोदे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अपात्रतेबाबत काय निर्णय होणार, असा सर्वांना प्रश्न आहे. मात्र आज निर्णय होणार का, असा मला प्रश्न पडतोय. कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना विधीमंडळ सचिव यांच्याकडून ईमेल आलेली नाही, राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार? असा प्रश्न सरोदे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांनाच अपात्र ठरविले तर कायदेशीर निकाल असल्याचं मतही त्यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे.