मुंबई : MLA Disqualification Hearing : राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भातील शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला विलंब केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. यानंतर एका आठवड्यात (MLA Disqualification Decision) सुनावणी घेऊन, दुसऱ्या आठवड्यात सुनावणीची रुपरेखा आखून दोन आठवड्यानंतर अहवाल सादर करायचे निर्देश दिलं होते. यानंतर विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) कामाला लागले असून सुनावणी झाली आहे.
Live Updates:
- आमदार अपात्रते प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलाय. सर्व याचिकांची सुनावणी एकत्रित करा, अशी मागणी शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी केली आहे. आमच्या मागणीवर विचार का केला जात नाही, असा आक्षेपही शिंदे गटानं नोंदविला आहे.निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे. आम्हाला शेड्युल १० लागू होत नाही, असा युक्तीवद शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. ३४ याचिका एकत्र करून एकत्रित सुनावणी घेतली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. पुढील सुनावणी कधी घेणार? वेळापत्रक कसे असेल असा प्रश्नही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
- ठाकरे गटाकडून आमदार अनिल परब, सुनील प्रभू, खासदार अनिल देसाई हे उपस्थित आहेत. अपात्रता प्रकरणात एकूण ३४ याचिका सुनावणीकरिता आहेत. या याचिकांबद्दल वेळापत्रक ठरवलं जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटिसा :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एका आठवड्यात आमदारांच्या आपात्रतेबाबतचा निपटारा करण्याबाबत प्रोग्राम तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नव्यानं शिवसेनेच्या 54 आमदारांना नोटीस बजावल्या असून, सोमवारी दुपारी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. अपात्रतेबाबत सर्व याचिका एकत्र करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गटप्रमुखांना बोलवणार : शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदपत्रं एकमेकांना देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानुसार या आठवड्यात नवीन सुनावणी होण्याबाबत संकेत दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधिमंडळाच्या कायद्याचा नियमाप्रमाणं दिरंगाई केली जाणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासोबत घाईत निर्णय घेणार नसल्याची प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली होती. नार्वेकर पुढे म्हणाले की, गरज पडल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे म्हणजे शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावणीसाठी बोलवलं जाऊ शकतं. सोमवारी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या 54 आमदारांना सुनावणीबाबतचं वेळापत्रक दिलं जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार दोन्ही गटांच्या आमदारांना सुनावणीला सामोरे जावं लागेल.
सुनावणी लाईव्ह करावी : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी लाईव्ह करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढं करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडं प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडं आहे . संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे, ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं वडेट्टीवारांनी केली आहे.
हेही वाचा -
- Anil Parab On MLA Disqualification : विधान परिषदेचे ते तीन आमदारही अपात्र होणार - अनिल परब
- Shiv Sena Petition : एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घ्यावी-सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- MLA Disqualification Case : ठरलं! 'या' तारखेपासून आमदार अपात्रतेसंदर्भात होणार सुनावणी; राहुल नार्वेकरांची माहिती