मुंबई MLA Disqualification case : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. गुरुवारी सकाळी ११ वाजता विधान भवनात सुनावणीला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशीही तब्बल ६ तास ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी झाली. या उलट तपासणी दरम्यान अनेक मुद्दे उपस्थित करत शिंदे गटाचे वकील महेश जठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी विशेषतः व्हीपच्या मुद्द्यावर सुनील प्रभू यांची पूर्णतः कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत व शिंदे गटाचे वकील महेश जेठमालनी यांच्यामध्ये 'तू तू मैं मैं' सुद्धा दिसून आलं. आता पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.
कारवाई लांबवण्याचा प्रयत्न : गुरुवारी (23 नोव्हेंबर) सुनावणीच्या अगोदरच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानभवनाला पत्र लिहीत, सुनावणीवर नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीनं त्यांची उलट तपासणी केली जात आहे, हा केवळ वेळकाढूपणा असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कारवाई लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे सुनावणी दरम्यान शिंदे गटाला झुकते माप देत असल्याचा आरोपही त्यांनी नार्वेकर यांच्यावर केलाय.
देवदत्त कामत यांचा आक्षेप : गुरुवारी सुनावणी सुरू झाल्यावर महेश जेठमलानी शिंदे गटाचे वकील हे पहिल्यापासूनच आक्रमक दिसले. त्यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी २१ जून २०२२ रोजी बैठकीबाबत जो व्हीप बजावला होता त्यावरून त्यांना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना कोंडीत पकडण्याचा जो काही प्रयत्न त्यांच्याकडून चालू होता, त्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतला. यावर महेश जेठमलानी यांनी देवदत्त कामत यांना उद्देशून तुम्ही जूनियर असून मध्ये मध्ये बोलत जाऊ नका, असं संतापानं म्हंटलं. यावरून दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये तू तू मैं मैं.. झाली. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही वकिलांना शांत राहण्याचा सल्ला देत दोन्ही वकिलांना समजसुद्धा दिली.