मुंबई :राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. निलंबनाची कारवाई केवळ अध्यक्षच करू शकतात, अन्य कुठलीही संस्था ही कारवाई करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खलबल उडाली असून सत्ता संघर्षाच्या निकाला दरम्यानच एका खाजगी कार्यक्रमासाठी ते लंडन दौऱ्यावरही जाणार आहेत.
कुठलीही संस्था कारवाई करू शकत नाही :राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल आहे. या निकालानंतर भविष्यातील राजकीय घडामोडी ठरवल्या जाणार आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आमदार अपात्रेतवर अतिशय महत्त्वाचं असे हे वक्तव्य आहे.
निलंबनाची कारवाई केवळ अध्यक्षच करू शकतात अन्य कुठलीही संस्था ही कारवाई करू शकत नाही - राहुल नार्वेकर
विरोधक कोर्टत जाऊ शकतात : त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खलबल उडाली आहे. राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे की, कोर्टाने जरी शिंदे गटाला अपात्र मानलं तरी सुद्धा ते ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल. त्या कारणाने तो माझा अंतिम निर्णय राहील. तसेच त्यावर ज्यांना आक्षेप असेल ते कोर्टात जाऊ शकतात असेही नार्वेकरांनी म्हटल आहे.
नार्वेकर लंडन दौऱ्यावर :एकीकडे सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका महत्त्वाची असताना राहुल नार्वेकर हे ११ ते १५ मे या कालावधीत लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. सत्ता संघर्षाच्या निकालाकडे फक्त महाराष्ट्राच नाही तर, संपूर्ण देशाच लक्ष लागलेलं आहे. महत्त्वाच्या निकालानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हे सर्व माहीत असतानांसुद्धा राहुल नार्वेकर हे लंडनच्या दौऱ्यावर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लंडनला ते एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात आहेत. तिथे ते राष्ट्रकुल मंडळा सोबत एक महत्त्वाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत. राष्ट्रकुल मंडळाचे शिबिर मुंबईत आयोजित करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे समजते.