मुंबई:उद्धव ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नेहमी अधिवेशनादरम्यान चर्चेत राहिले आहेत. विशेष करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले होते. अशातच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांच्यावर आसूड ओढण्यात ते नेहमी पुढे राहिले आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला:याविषयी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उद्या नवीन वर्ष गुढीपाडवा आहे. तो आपण साजरा करणार आहोत. चैत्र महिन्यात असणारे हे नवीन वर्ष आहे. आपल्या हातून चांगले काम व्हावे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या जिल्ह्याचे नाव उंच जावो हीच इच्छा असते. आज मला समजले की, टेक्सटाइलचे कमिशनर ऑफिस दिल्लीत जात आहे. मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत आहे. याला उभारी द्यायची गरज होती. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, महत्वाची कार्यालये २०१४ नंतर गुजरातमध्ये नेण्यात आलीत. टेक्सटाइल ऑफिस हे जर दिल्लीला नेले जात असेल तर महाराष्ट्र कसा खिळखिळा होत आहे हे आता जनतेने पहावे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
मला सभागृहात बोलू दिले जात नाही:भास्कर जाधव पुढे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे. निसर्ग कोपल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. कारण मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे अशी अपेक्षा असते. परंतु, कामकाजातून मला बाहेर ठेवले जात आहे. हे सर्व जाणीव पूर्वक केले जात आहे. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. मला ही फार मोठी खंत आहे.