मुंबई -गतवर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
मागील सरकारमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादी पक्षाने 'सेल्फी विथ खड्डा' ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला नेत्या सुप्रिया सुळे यांनी जागोजागी खड्ड्यात सेल्फी काढून माध्यमांवर जोरदार सरकार विरोधात मोहीम चालविली होती. परंतु, आता महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादीचे सरकार आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांची सद्यस्थितीत दुरवस्था झालेली आहे मग आता का राष्ट्रवादी 'सेल्फी विथ खड्डे' मोहीम राबवत नाहीत? असा प्रश्न भाजप नेते शेलार यांनी विचारला आहे.
मुंबई- गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून कोकणातून परतीच्या प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. भाजप सरकारच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असतानाही त्यावेळी राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा, असे आंदोलन करून राजकारण केले होते. यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले तर नाहीच, कोकणात तर अख्खा रस्ता उखडून गेला मग राष्ट्रवादी सेल्फीचा तो 'स्तुत्य उपक्रम' का राबवत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज का सरकारला ऐकू येत नाही? असे सवाल करीत भाजपा नेते आमदार शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे पत्र लिहून लक्षही वेधले आहे.