मुंबई :कोकणातील नाणार येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प इथे होऊ शकला नाही. कोकणातील नागरिकांना मिळणारा रोजगारही मिळाला नाही. आता हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी आरामको या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केल्याचे समजते आहे. दहा अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान, सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे, असे अशी शेलार म्हणाले.
उबाठा गटाने महाराष्ट्राचे नुकसान केले :गेली सहा वर्ष कोकणातील नानार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कोकण, महाराष्ट्र, देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. हा प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करत आहेत. त्या नानार विरोधी आंदोलनात तर सहभागी नव्हत्या ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. देशविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हात मिळवनी तर नव्हती ना? असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाणारला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पाकिस्तानला जाण्यास अप्रत्यक्षरीत्या मदतच केल्याचा ठपका आशिष शेलार यांनी ठाकरेंवर ठेवला आहे.