मुंबई : वांद्रे येथील बेकायदा बांधकामप्रकरणी शिवसेना आमदार अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ते बांधकाम पाडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांना अवमानाची नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळेच आमदार परब यांनी आज विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना केली. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगितले.
शिवसेना कार्यालय बेकायदेशीर : वांद्रे येथील म्हाडाच्या इमारती क्रमांक ५७ आणि ५८ च्या मधोमध असलेले शिवसेनेचे कार्यालय म्हाडाने बेकायदा घोषित केले. यासंदर्भात आमदार अनिल परब यांना नोटीस देण्यात आली होती. हे कार्यालय अनिल परब यांचे असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी सातत्याने केला आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हातकड्या लावून नोटिसा बजावून माध्यमांतून बदनामी करण्यात आली. मला नोटीस देण्यापूर्वी म्हाडाने कागदपत्रे तपासायला हवी होती. मात्र तसे न करता जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, हे कार्यालय माझे नसल्याचे तपासात उघड झाले. म्हाडा प्राधिकरणानेही एका पत्रात स्पष्टीकरण दिले आहे.
बोरीकर यांच्यावर हक्कभंगाची नोटीस : माजी मंत्री असताना लोकप्रतिनिधी म्हणून जनमानसातील माझी प्रतिमा डागाळली. त्यामुळे अनिल परब यांनी किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल केली. विधानपरिषदेतील हक्कभंग समिती अद्याप गठीत झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. हक्कभंगाची चौकशी करून येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उपसभापती नीलम गोर्हे यांनी स्पष्ट केले. लवकरच विधान परिषदेतील गटनेत्यांची बैठक घेऊन हक्क गट समिती नेमण्याबाबत विचार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.