मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे नेते अबू आझमी हे देखील आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर नाराज आहेत. अबू आझमींनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर फोन उचलत नसल्याचा थेट आरोप केला आहे.
आदित्य ठाकरे लोकप्रतिनिधींचा साधा फोनही उचलत नाहीत, आघाडी सरकारमधील नेत्याची स्पष्ट नाराजी - अबू आझमी पत्रकार परिषद
आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत. आदित्य ठाकरे हे लोकप्रतिनिधींचा साधा फोनही उचलत नाहीत, असा थेट आरोप आमदार अबू आझमी यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.
मानखुर्द शिवाजीनगर येथे कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'एसएमएस' नावाच्या एका कंपनीला कंत्राट दिले आहे. पण हे करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे लोकांच्या समस्येला व प्रदूषणाच्या समस्येला एसएमएस कंपनी कारणीभूतआहे. या कंपनीविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून अबू आझमी हे सरकारकडे तक्रार करत आहेत. मात्र, त्याकडे गेल्या सरकारने देखील लक्ष दिले नाही, पण या सरकारमधील आपल्याच मंत्र्यांकडे तक्रार केली असताना देखील ही कंपनी बंद करण्याच्या मागणीकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला. एसएमएस कंपनीमुळे त्या भागातील सुमारे १२ लाख नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
हेही वाचा -७२ हजार रेमडिसीवीर इंजेक्शन विकत घेण्याचा पालिकेचा निर्णय, १० हजार उपलब्ध
आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत. आदित्य ठाकरे हे लोकप्रतिनिधींचा साधा फोनही उचलत नाहीत, असा थेट आरोप आमदार अबू आझमी यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नाराज असल्याचे उघड झाले आहे. मित्रपक्षांच्या नाराजीवर सरकारकडून काय प्रयत्न केले जाणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.