मुंबई - मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वरळी विभागात आहेत. या विभागातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनावर यशस्वीरित्या मात करून 137 योध्ये बाहेर पडले. या योद्ध्यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी स्वतः वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे उपस्थित राहून या सर्वांना धीर दिला तसेच टाळ्यांच्या कडकडाटात या सर्वांचे कौतुक केले.
महापौर किशोरी पेडणेकर उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आपण सर्व 137 कोरोनाबाधितांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे योग्य ते उपचार करण्यात आले. यामध्ये जी दक्षिण विभागातील 95 जणांचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्यांमध्ये 84 वर्षीय वृद्ध महिलेपासून ते दहा वर्षीय लहान बालकांपर्यंतचा समावेश असल्याचे महापौरांनी सांगितले.