महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद; राज्यातील शाळांचा आढावा... - school overview

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा आजपासून (23 नोव्हेंबर) सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.

school
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 23, 2020, 7:43 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा आजपासून (23 नोव्हेंबर) सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शाळा सुरू झालेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी तर फक्त शिक्षकांचीच उपस्थिती होती. काही शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी हजर होते. राज्यातील शाळांमधला 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

  • आठ महिन्यानंतर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरू; विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

लातूर - सकाळच्या प्रहरी विद्यार्थ्यांची रेलचेल सुरू झाली. कुणी सायकलवरून तर कोणी पायी शाळेकडे मार्गस्थ होत असलेले चित्र आठ महिन्यानंतर पाहवयास मिळाले. ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात होते. मात्र, शाळेची ओढ ही काही न्यारीच असल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून होता. आज तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. लातूर जिल्ह्यातील 647 पैकी 542 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.

  • जालन्यात शिक्षकांची तयारी, मात्र विद्यार्थीच गायब

जालना -कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी आज पहिल्यांदा शाळेची घंटा वाजली. मात्र, पहिल्या घंटेचा विद्यार्थ्यांमध्ये असलेला उत्साह दिसला नाही. दरम्यान, शाळेने विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी सर्व खबरदारी घेत नियोजन केले. मात्र, शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे.

  • सिंधुदुर्गात शाळा सुरू, विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद..

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आजपासून अखेर शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील 30 टक्के शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. कणकवली देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातून विद्यार्थी येथे येतात. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत येथे 861 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांपैकी आज 65 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

  • संमतीपत्र न आल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठविले परत

अकोला - राज्य सरकारने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या भरवशावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आधीच गोंधळाची स्थिती आहे. त्यात शाळा समितीलाही काय करावे, हा प्रश्न असताना शिवसेना वसाहतीमधील मनपाच्या शाळा क्र. 26 मध्ये विद्यार्थ्यांनी पालकांचे संमतीपत्र न आल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी परत पाठविले आहे. विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे शिक्षकांची कोरोना तपासणी झाली, विद्यार्थ्यांची का नाही, असा प्रश्नही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

  • गडचिरोलीत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांविनाच वाजली शाळेची घंटा

गडचिरोली- कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची पहिली घंटा आज (23 नोव्हेंबर) वाजली. आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार म्हटल्यावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. परंतु, कोरोना महामारीचे संकट अद्यापही दूर न झाल्याने 'मस्ती'ची पाठशाळा आता 'धास्ती'ची पाठशाळा झाली आहे. त्यामुळेच गडचिरोली शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांविनाच शाळेची घंटा वाजल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर, बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत पाहायला मिळाली.

  • रायगड जिल्ह्यातील अनेक शाळेत आज घंटा वाजलीच नाही

रायगड - आज शाळांची घंटा वाजण्याचा मुहूर्त जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टळला, तर काही ठिकाणी कोरोना नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेचे वर्ग भरले न गेल्याने आठ महिन्यानंतर वाजणारी घंटा वाजली नाही. तर अलिबागमधील दत्ताजी खानविलकर शाळेसह जिल्ह्यातील काही शाळा आज नियमांचे पालन करून सुरू झाल्या आहेत.

  • बीडमधील शाळा सुरू; मात्र तीनच विद्यार्थी हजर

बीड - बीड शहरातील चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये नववी व दहावीचा वर्ग मिळून 175 विद्यार्थी आहेत. यापैकी केवळ तीनच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत मुलं पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले आहे. तीन मुलांवर शाळा सुरू करायची कशी? असा प्रश्न चंपावती इंग्लिश स्कूलचे प्राचार्य ए. आर. गंधे यांनी उपस्थित केला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप शाळेला मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शाळांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

  • अमरावती : जिल्हा परिषद कन्या शाळेत फक्त 12 विद्यार्थिनींचीच हजेरी; इतर शाळांमध्येही शुकशुकाट

अमरावती- राज्य शासनाने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी कोरोनाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे, आज अमरावती शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत केवळ 12 विद्यार्थिनींचीच हजेरी लागली. तर, इतर बाकी शाळांमध्ये एकही विद्यार्थी फिरकला नसल्याचे दिसून आले.

  • रत्नागिरीत पालक उदासीन, विद्यार्थ्यांविना शाळा सुरू

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आज सुरू झाल्या आहेत. मात्र अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास असहमती दर्शवली आहे. जिल्ह्यात नववी ते बारावीचे 83,136 विद्यार्थी असून, जिल्ह्यातील केवळ 2 हजार 281 विद्यार्थ्यांना पालकांनी मुलांनी शाळेत येण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांविनाच शाळा भरत असल्याचे चित्र आहे.

  • भंडारा जिल्ह्यातील शाळा बंदच; शिक्षक कोरोना चाचण्यांच्या प्रतिक्षेत

भंडारा -कोरोना चाचण्या झाल्या नसल्याने भंडारा जिल्ह्यातील शाळा 23 तारखेला सुरू झाल्या नाहीत. तसेच या शाळा भविष्यात कधी सुरू होतील याविषयी कोणीही अधिकारी ठामपणे सांगू शकत नाही. जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या आणि दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्या यांचे गणित केल्यास सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही? असा प्रश्न आता पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पडला आहे.

  • बारामतीत ८४पैकी केवळ तीनच शाळांची वाजली घंटा

बारामती - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले होते. सरकारच्या आदेशानुसार बारामतीमधील ८४ शाळांपैकी केवळ ३ शाळा सुरू झाल्या आहेत. अन्य शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर कोविड चाचणी झाली नाही, त्यामुळे शाळा सुरू करता आल्या नाही.

  • सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू, विद्यार्थ्यांचा झिरो प्रतिसाद

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांच्या गेटवर मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन तयारी केली होती. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांनी न येणेच पसंत केले. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांची शाळेच्या पहिल्या दिवशी निराशा झाली. पालकांमधूनही शाळा बंद करण्याची मागणी होती. सोलापूर जिल्ह्याभरात नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 1 हजार 87 शाळा आहेत. जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील शाळांत 2 लाख 52 हजार 434 विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी या तीन विषयांचे अध्यापन शाळेत, तर उर्वरित विषयांचे अध्यापन हे ऑनलाईन प्रणालीने करण्याची तयारी शाळेने केली होती.

  • या जिल्ह्यांमधील शाळा सुरू -

लातूर, नंदुरबार, रायगड, गडचिरोली, वर्धा, अमरावती, औरंगाबाद ग्रामीण, बीड, पुणे ग्रामीण

  • या जिल्ह्यांमध्ये बंद असणार शाळा -

मुंबई, नागपूर, ठाणे, औरंगाबाद शहर, जळगाव, नाशिक, पुणे

  • राज्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक कोरोनाबाधित..

शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचण्यांमध्ये राज्यात तब्बल पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. मुंबईसह राज्यातील ५० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.

हेही वाचा -कराचीदेखील भविष्यात भारताचा भाग असेल -देवेंद्र फडणवीस

हेही वाचा -कोरोनाच्या संकटात कापूस निर्यातदारांना दिलासा; भारतातून बांगलादेशात ३० लाख गाठींची होणार निर्यात

हेही वाचा -ऑनलाइन क्लासेसला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना 'शिक्षा'... डिसेंबरपासून सक्तीची हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details