मुंबई - पाणी बचतीसाठी सर्वसामान्य माणूस नक्की काय करू शकतो? असा विचार नेहमी केला जातो. पण, शॉवर लावून अंघोळ करताना साबण लावताना तो शॉवर बंद करणे. तसेच, लघुशंका केल्यावर लागेल तेवढंच पाणी वापरूनदेखील आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व पाळू शकतो असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. नेटवर्क 18, अमिताभ बच्चन आणि हार्पिक कंपनीने संयुक्तरित्या सुरू केलेल्या 'मिशन पानी' या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत असून कुठे दुष्काळ तर कुठे पूर परिस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी, पाण्याची बचत आणि संवर्धन करण्यावर सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत अमिताभ यांनी व्यक्त केले. मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी हे सहभागी झाले होते. तर, केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
बच्चन यांनी यावेळी बोलताना पाण्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असले तरीही त्यासाठी एकत्रितपणे पुढे येणे गरजेचे असल्याचे म्हणाले. प्रत्येकाने स्वयंशिस्त लावण्यासोबतच जे लोक या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत त्यांचे कार्य लोकांसमोर येण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच, आपल्या लहानपणी पाणी विकत घेऊन ते साठवावे लागेल असं कुणी सांगितलं तर हसू यायचे मात्र, आज ते वास्तव असल्याने खेद वाटत असलाचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यराज्यातले तंटे पाणी संवर्धनातला मोठा अडथळा - गडकरी
पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याची ओरड अनाठायी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मात्र, पावसाचे पाणी अडवण्यात आपण असमर्थ ठरत असल्याने पाण्याचा तुटवडा होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात यांच्यातील पाणीवाटपाचे तंटे, छत्तीसगड, ओडिशा असो किंवा उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशातील पाण्याचे वाद असो आपण ते चर्चेने सोडवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले. तसेच, आत्तापर्यंत पाण्याच्या बाबतीत 9 तंटे सोडवण्यात यशस्वी झालो असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अनेकदा राज्य स्वतः ते पाणी वापरत नाही आणि दुसऱ्याला वापरूही देत नाही त्यामुळे पाणी समुद्रात मिसळून वाया जाते. हे चित्र बदलत नाही तोपर्यंत पाण्याची उपलब्धता करून देता येणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.