मुंबई- भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात सध्या ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) रडारवर असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटींग समिती नेमली होती. या समितीचा चौकशी अहवाल ईडीला सादर करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच मंत्रालयातूनच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवाल न मिळाल्यास खडसेंच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
खडसेंसाठी अहवाल महत्वाचा
फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे 3.1 एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. 31 कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला. याप्रकरणी चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जून, 2017 मध्येच फडणवीसांकडे सादर केला होता. फडणवीस यांनी खडसेंना क्लीनचीट दिली होती. आता याच प्रकरणात ईडीकडून खडसेंची चौकशी सुरू आहे. अशावेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हा अहवाल खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.