मुंबई - पाणी बिल वेळेवर भरले नाही तर सामान्य नागरिकांचे पाणी कापणाऱ्या महापालिकेचे राज्याच्या मंत्र्यांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे पाणी बिल थकवले आहे. त्यात मुख्यमंत्री राहत असलेल्या वर्षा बंगल्याचाही समावेश आहे. वर्षा बंगल्याचे ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकीत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी पाणी बिल थकवणाऱ्यांची माहिती मागवली होती. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहत असलेल्या वर्षा बंगल्याची पाणी बिलाची एकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये इतकी आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार राहत असलेल्या देवगिरी बंगल्याची थकबाकी १ लाख ४५ हजार ०५५ रुपये इतकी आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे राहत असलेल्या सेवासदन या बंगल्याची १ लाख ६१ हजार ७१९ रुपये इतकी थकबाकी आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी मंत्र्यांची निवासस्थाने तसेच सरकारी बंगल्यामध्ये वापरण्यात आलेल्या पाण्याचे ८ कोटी रुपये सरकारने थकवले आहेत.
यात ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी), परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक), मुख्यमंत्र्यांचे सुरक्षाकर्मी राहत असलेल्या तोरणा, रामराजे निंबाळकर विधानसभा सभापती राहत असलेले अजंठा, सरकारी पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते ते सह्याद्री अतिथीगृह व इतर शासकीय निवासांची नावे आहेत.