मुंबई - महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचीही भर पडली आहे. सामंत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते होम क्वारंटाइन असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही क्वारंटाइन व्हावे. काही लक्षणे आढळ्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उदय सामंत मुंबई येथील आपल्या निवासस्थानी पुढील दहा दिवसांसाठी क्वारंटाइन राहणार आहेत. उदय सामंत हे दुसऱ्यांदा क्वारंटाइन होत आहेत. गणपती उत्सवाच्या दरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांच्या संपर्कात आल्याने सामंत यांनी स्वतःला 15 दिवस क्वारंटाइन करून घेतले होते.
पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरीतील आपल्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी विविध विकासकामासंदर्भात त्यांनी बैठका घेतल्या. सोबतच राज्यात सुरू असलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात गेल्या तीन आठवड्यापासून ते विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी विद्यापीठांचा दौराकरून आढावा घेत होते. काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले.
राज्यभरातील विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सामंत यांनी कर्मचारी-अधिकारी संघटनांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये अजूनही लेखणीबंद आंदोलन सुरू आहे.