मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात नवनवीन राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर मंत्री उदय सामंत यांच्यासह भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा ज्याचा त्याचा प्रश्न? :या भेटीबाबत बोलताना मंत्री उदय संबंध म्हणाले की, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असेल तर त्या भेटीत काय चर्चा झाली माहीत नाही. परंतु उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येत असतील तर हा त्यांचा विषय आहे. कोणी कोणासोबत जावे व कोणी कोणासोबत यावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असल्याचेही उदय सामंत म्हणाले आहेत. अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता असून, शिंदे गटात प्रवेश केलेले काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. अशा अनुषंगाने उदय सामंत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही बरंच काही सांगणारी आहे.