मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिल्यानंतर या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी आज (दि. 29 ऑगस्ट) राज्यातील कुलगुरुंसह झालेल्या बैठकीत कुलगुरूंची समिती गठीत करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.
कुलगुरूंची ही समिती राज्यातील सर्वच विद्यापीठातील परिस्थिती आणि जिल्ह्यात असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा केव्हा घेतल्या जातील, तसेच त्या परीक्षांच्या संदर्भात काय तरतुदी करता येतील यासाठीचा आढावा आज घेऊन त्याचा अहवाल समिती उद्याच तातडीने सरकारला देणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज (शनिवार) राज्यातील कुलगुरूंची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या सर्व कुलगुरुंना या परीक्षा घेण्यास संदर्भातील अडचणी आणि त्यातील तरतुदींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कुलगुरुंचे मत जाणून घेऊन यासाठीची समिती गठीत करण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला.
अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना राज्यातील एकाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याचा त्रास होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. या परीक्षा सहज, सुलभ पद्धतीने कशा आणि कधी घेता येतील यासाठीच कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरुंसह ऑनलाइन बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली.