महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Uday Samant : वीर सावरकरांविषयी आक्रमक, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मौन; मंत्री उदय सामंत यांची दुटप्पी भूमिका? - उदय सामंत राहुल गांधी टीका

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली. या दरम्यान, पत्रकारांनी उदय सामंत यांना प्रश्न विचारत सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या लिखाणाच्या मुद्द्यावरुन घेरले असता सामंतांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Minister Uday Samant
उदय सामंत

By

Published : Mar 28, 2023, 10:17 PM IST

मुंबई : वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी अवमान केल्यानंतर भाजपसह शिंदे गट आक्रमक झाला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भूमिकेवर तोफ डागली. पत्रकारांनी यावेळी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या लिखाणाच्या मुद्द्यावरुन घेरले असता, ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून त्यांच्याविषयी कोणाच्या मनात शंका-कुशंका असण्याचे कारण नाही, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने सामंत यांना पत्रकार परिषद गुंडाळवी लागली.

वीर सावरकरांचा अवमान :उदय सामंत त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून वीर सावरकर यांचा अवमान करायला सुरूवात केली. सावरकरप्रेम दाखवणाऱ्यांनी त्या यात्रेत सहभागी होत त्यांना साथ दिली. इतिहासाची माहिती नाही, वीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा समजून घ्यायचा नाही आणि वाट्टेल त्या शब्दात टीका करायची, अवमान करायचा हे गांधी यांचे चालू होते. अधिवेशनात देखील टीका करण्यात आली. महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले.

देशाची माफी मागावी : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा केलेल्या अवमानाबाबत शिवसेना-भाजपने विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार त्यावेळी मूग गिळून बसले आणि आता महाराष्ट्रासह देशभरातून असंतोष उफाळून येत असताना मालेगावच्या सभेत ठाकरे गटाच्या प्रमुखांनी सावरकर त्यांचे दैवत असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरवयात्रा काढण्याचे जाहीर करताच ठाकरे गटाच्या प्रमुखांनी दिल्लीच्या बैठकीत बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले. दरम्यान मित्रपक्षाला आवडत नसेल तर यापुढे सावरकरांबाबत बोलणार नाही, असे राहुल गांधी म्हटल्याचे वृत्त आहे. हे सर्व नौटंकी आहे. निवडणुका आल्या म्हणून लोकक्षोभ शांत करण्यासाठी हे नाटक सुरु असल्याचा सामंत म्हणाले. पण राहुल गांधीना खरोखरच चूक झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्राची, देशाची माफी मागावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.


राहुल गांधींना आव्हान :मंत्री सामंत पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान येथे कोठडीत असताना त्यांना असह्य यातना भोगाव्या लागल्या. त्यांनी सहन केलेल्या यातनांची, अवमान करणाऱ्यांना जाणीव व्हावी म्हणून राहुल गांधी यांनी एक दिवस तरी अंदमानच्या कोठडीत राहावे, अशी मागणी होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानप्रमाणे रत्नागिरीतही वास्तव्य होते. 6 जानेवारी 1924 ते 17 जून 1937 या काळात त्याचे वास्तव्य होते. त्यावेळी त्यांना रत्नागिरीच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. राहुल गांधी यांनी अंदमान ऐवजी रत्नागिरीच्या कोठडीत एक राहून दाखवावे. आपण त्यांचा नागरी सत्कार करू, असे आव्हान सामंत यांनी दिले.

सावरकरांविषयी काँग्रेसने वाद निर्माण केला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वीर सावरकर यांनी केलेल्या लिखाणाविषयी, शिंदे गटाची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मंत्री सामंत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. कॉंग्रेसने सावरकर यांची वादग्रस्त बाजू पुढे आणली. परंतु, वीर सावरकर यांनी देशासाठी त्याग केला, ते कुठेही आणले नाही. सावरकर यांच्या देशाबद्दल केलेल्या कार्याविषयीची माहिती युवापिढीला होणे अपेक्षित असल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र, पत्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने मंत्री सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून देशाचे आदर्श आहेत. कोणाच्या मनात त्यांच्याबद्दल शंका - कुशंका असण्याचे कारण नाही, असे सामंत म्हणाले. तसेच सावरकरांच्या माफीनामा पत्रावरुन पत्रकारांनी छेडले असता, सामंत यांची कोंडी झाली.




राहुल गांधी देशाचे सल्लागार नाहीत : अदानीच्या दोन हजार कोटींच्या अफरातफरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. देशात हा मुद्दा महत्वाचा असताना, सावरकर वाद का निर्माण केला जातोय, असा प्रश्न मंत्री सामंत यांना पत्रकारांनी विचारले असता, गांधी देशाचे सल्लागार नाहीत. आरोप करणे सोपे आहेत. पुराव्यानिशी आरोप करून ते सिध्द करावे. मात्र, राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली.

हेही वाचा : Chandrakant Khaire : शिंदे-फडणवीस शासनावर चंद्रकांत खैरेंची टीका; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details