मुंबई:कर्नाटक राज्यात कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने कंबर कसली. या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. मंत्री सामंत यांनी या बैठकीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर चिमटा काढला. दहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला. अनैसर्गिक युती तोडावी, अशी यामागे एकच भूमिका होती. शिवसेना त्यावेळी नंबर दोनचा पक्ष होता. महाविकास आघाडी झाल्यानंतर पक्षाची वाताहत झाली. आघाडीमध्ये ठाकरेंचे स्थान घसरले आहे. त्यामुळेच आघाडीच्या बैठकीत ठाकरेंच्या बसण्याचे स्थान कुठे होते, हे दिसून आले, असा खोचक टोला मंत्री सामंत यांनी लगावला. तसेच कर्नाटक निवडणुकीनंतर अनेकांना महाराष्ट्रात आघाडीचे सरकार येईल, असे स्वप्न पडू लागली आहेत. मात्र, आघाडीचे नेतृत्व नाना पटोले करणार का, असा सवाल मंत्री सामंत यांनी विचारत, शिवसेना ठाकरे गटाला डिवचले.
हा तर उरलेसुरले टिकवण्याचा प्रयत्न:राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जाते. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याने त्यांच्यावर टीका केली जाते. ठाकरे गटाकडून सरकार घटनाबाह्य आहे. तर राष्ट्रवादीकडून बहुमताचे सरकार आहे, असे म्हटले जाते. आघाडीत दोन मतमतांतर आहेत, असे वारंवार दिसून येते. आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. मात्र, ठाकरे गट 5 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपशी केलेली प्रतारणा ठाकरेंच्या नाशाचे कारण ठरली, असा शब्दांत मंत्री सामंतांनी ठाकरेंना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांवर वाटेल त्या शब्दांत टीका सुरु आहे. उपध्यक्षाकडून अपात्र बाबत विधाने होत आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला असा दावा सुरु आहे. पक्षांमधील उरले सुरले पदाधिकारी टिकवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे, असे मंत्री सांमत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील कार्यपध्दतीचा देखील त्यांनी यावेळी पाढा वाचला.
जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप नाही: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रत्येकाला घाई सुरु आहे. परंतु, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे निवडणुका रखडल्या आहेत. निवडणुका जेव्हा होतील, त्याला सामोरे जायला आम्ही तयार आहोत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. निवडणूक साठी जागा वाटपचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यावर निर्णय घेतील. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असेही सामंत म्हणाले. कर्नाटक निवडणुकीनंतर ईव्हीएम नको, अशी ओरड कॉंग्रेसकडून सुरु आहे. विश्वास नसेल तर, कर्नाटकची निवडणुक परत घ्या, असे प्रत्युत्तर मंत्री सांमत यांनी दिले.