मुंबई - काँग्रेसचे नेते आणि पशूसंवर्धन, दूग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
मंत्री सुनील केदारांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - मुंबई कोरोना पॉझिटिव्ह केसेस
राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच अनेक मंत्री हेही यातून सुटू शकले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमधील आतापर्यंत तब्बल पाच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात आता मंत्री सुनील केदार यांचीही भर पडली आहे.
मागील चार दिवसांपूर्वी त्यांना ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन कोरोना आणि त्यासंदर्भातील इतर तपासण्या करून घेतल्या होत्या. त्यात त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज समोर आल्याने तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तब्बल दोन आठवड्याच्या उपचारानंतर ते त्यातून मुक्त झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांनाही कारोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री सुखरूपपणे त्यातून बाहेर पडले. मात्र, आता पशूसंवर्धन, दूग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून इतर कोणतेही लक्षणे त्यांना तूर्तास नसल्याचे सांगण्यात आले.