मुंबई : मुंबई शहर, उपनगर, नंदुरबार , अकोला या विभागातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
राज्य रस्ता सुरक्षा अभियान : राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे उद्घाटन मंत्री देसाई यांच्या हस्ते आज मुंबईत एनसीपीए सभागृह, नरिमन पॉईंट येथे करण्यात आले. या कार्यक्रमास परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनोटिया, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, जेष्ठ अभिनेता जॉकी श्रॉफ आदी उपस्थित होते.
अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट : मंत्री देसाई म्हणाले, परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ जानेवारी २०२३ पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येईल. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. नागरिकांना शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे हे शासनाचे उद्दिष्ट नाही. मुलांना शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकवले गेले पाहिजेत. शाळा महाविद्यालयांमध्ये ज्या पालक आणि शिक्षक सभेत परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करावे. परिवहन विभागामार्फत अनेक सुविधा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन प्रवास करताना वेग मर्यादा आणि वेळ मर्यादा पाळली पाहिजे.