मुंबई - राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात की, न घ्याव्यात याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. अखेर रविवारी (दि. 31 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हिताचा निर्णय घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर एकदाचा पडदा पाडला. या प्रकरणात उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याची बोलले जाते आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मते ते जाणून घेत होते. ते पहिल्यांदाच मंत्रीपद भूषवित असल्याने या प्रकरणाबाबत त्यांच्यावर मोठे दडपण होते. याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना फेसबुक पेजवर एक खुले पत्र लिहिले आहे.
या पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला. त्यानंतर मलाच परीक्षा पास झाल्यासारखे वाटत आहे. टाळेबंदी सुरू झाल्यापासून हीच आपली अंतिम परीक्षा असल्यासारखे मला वाटत आहे. कारण, परीक्षेच्यावेळी जशी चिंता, भीती जाणवते तसेच वाटत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत चालला होता. यामुळे गावातून शिक्षणासाठी शहरी भागात आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले घर गाठले होते. यामुळे सर्व बाबींचा विचार करता हा निर्णय आम्ही घेतला.