मुंबई - कोरोनाचे संकट, पावसाचे आगमन आणि शेतकऱ्यांची धांदल हा संभाव्य धोका लक्षात घेऊन कापूस खरेदीतील अडचणी दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही खरेदी 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबतचा जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी सूचना केल्या.
पाटील म्हणाले, कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी आणि शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात. कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी. सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे. इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआयने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करून द्यावेत.