मुंबई :भाजपमध्ये गेलेले नारायण राणे, विनायक मेटे आदी गॅंगने राज्यात मराठा आरक्षणावर राजकारण करू नये. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. राणे आणि मेटे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करत त्यांनी राजकारण करू नये असेही सुनावले.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालानंतर महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप खासदार नारायण राणे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काल केला होता. या आरोपाचा समाचार घेत मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मलिक यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले. आम्ही या आरक्षणाच्या संदर्भात कोणताही वकील बदललेला नव्हता. भाजपने दिलेले वकिलच आम्ही ठेवले होते. यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु, काहीजण राज्यातील मराठा समाजात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या गॅंगनी या विषयाचे राजकारण करू नये, त्यापेक्षा या विषयावर पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांना त्यांनी या आरक्षणाला मदत करण्यासाठी सांगितले पाहिजे. तसेच, त्यासाठी कोर्टात हा मुद्दा हाताळला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.