मुंबई -अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागच्या फडणवीस सरकारवर जोरदीर टीका केली. फडणवीस सरकारने आपल्या सत्ताकाळात ज्याप्रकारे रामदेव बाबांना जमिनींची खैरात वाटली, तसे आम्ही केले नसल्याचे वक्तव्य मलिक यांनी केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भाडे तत्वावर आम्ही जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला जमीन दिली असल्याचे मलिक म्हणाले.
जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटला ५१ एकर जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याविरोधात विरोधीपक्षांकडून चुकीची माहिती माध्यमांना देण्यात आल्याने त्यावर मलिक यांनी मंत्रालयात एका पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट ही संस्था ऊस आणि इतर विषयावर संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, या संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असल्याने भाजप जर आक्षेप घेत असेल, तर त्यांचेही लोक या संस्थेवर आहेत ही बाब त्यांना माहीत नाही काय? असा सवालही करत मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.