मुंबई- पश्चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीमुळे रस्ते वाहतूक प्रभावित झाली असली तरी रेल्वेला टँकर बोगी जोडून मुंबईत दूध आणले असून नवीमुंबईत दुधाचा पुरेसा साठा केला आहे. त्यामुळे मुंबईत दुधपुरवठा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाने थैमान घातला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. सांगलीत महापुराने बुधवारी सकाळी २००५च्या सर्वोच्च पातळीचा रेकॉर्ड मोडला आहे.
पुरामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कृष्णा आणि वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूकही बंद पडली आहे.