मुंबई- भाजप तसेच विरोधी पक्षनेतेकेंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून हे सर्व कट कारस्थान करत असल्याचा आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.सचिन वाझे यांच्या कथित पत्रात थेट अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या त्या आरोपानंतर पत्रकारांसमोर त्यांनी आपली बाजू देखील मांडली. मात्र, कथित पत्रात पत्रातून अशाप्रकारे आरोप करणे ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आज जरी सुपात असला तरी उद्या जात्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.
...तर कोणत्याच सरकारला काम करता येणार नाही
सचिन वाझे यांच्या कथित पत्रानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. बुधवारी (दि. 7 एप्रिल) अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रामध्ये करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, तुरुंगात बसून असे लेटर बॉम्ब टाकण्याची ही कुठली पद्धत आहे, भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तुरुंगात बसून अशाप्रकारे कोणी पत्र लिहीत असेल तर, कोणत्याच सरकारला काम करता येणार नाही, असेही ते माध्यमांसमोर म्हणाले.